वाशिम - जिल्ह्यातील शिरपूर जैन येथील १९ वर्षीय ऋषिकेश अंबादास जाधव याने 'सॉरी फ्रेंडस' स्टेटस ठेवून गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. रविवारी (ता. २१ मार्च) ही घटना उघडकीस आली. ऋषिकेशच्या आत्महत्येने त्याचे मित्र व कुटुंबाला दुःख अनावर झाले.
जिन्यामध्ये लावला गळफास
शिरपूर येथील मालेगाव रस्त्यालगत वास्तव्यास असलेल्या जाधव कुटुंबातील १९ वर्षीय ऋषिकेश हा डिसेंबर २०२० पासून वाशिम ग्रामीण रुग्णालयात कंत्राटी तत्त्वावर वॉर्ड बॉय म्हणून कार्यरत होता. शुक्रवारची ड्युटी करून तो शिरपूरला परतला होता. शनिवारी दिवसभर घरी होता. शनिवारी रात्री ऋषिकेशने कुटुंबीयांसोबत जेवणही केले. सर्व काही ठीकठाक होते. कुटुंबातील सर्वजण रात्री झोपले.
दोन दिवसापासून परिसरात पावसाचे वातावरण असल्याने ऋषिकेशचे वडील रविवारी अंबादास जाधव हे मॉर्निंग वॉकला जाऊ शकले नाही. त्यामुळे ते घराच्या गच्चीवर वॉक करण्यासाठी जात असताना जिन्यामध्ये ऋषिकेश गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आला. ऋषिकेशने शनिवारी मध्यरात्री ते रविवार सकाळी ६ वाजता दरम्यान गळफास लावून आत्महत्या केली असल्याचा अंदाज आहे.
'सॉरी फ्रेंड्स' स्टेटस
तत्पूर्वी रात्री साडेनऊ वाजता त्याने आपल्या मोबाईलमध्ये 'सॉरी फ्रेंड्स' असे स्टेटस ठेवले होते. याप्रकरणी पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मालेगाव येथे पाठवला. ऋषिकेशच्या सॉरी स्टेटस ठेवून गळफास लावून केलेल्या आत्महत्येमुळे त्याच्या कुटुंबाचे व मित्राचे दुःख अनावर झाले.