वाशिम- जिल्ह्यातील शिवणी येथील एटीएम फोडणाऱ्या आंतरराज्यीय टोळीसह बँक तिजोरी लंपास करणाऱ्या आणि घरफोडी करणाऱ्या ४ टोळ्यांना अटक केली असून, यामाध्यमातून अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. अशी माहिती पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
एटीएम फोडणारी टोळी गजाआड
शिवणी येथील एसबीआय बँकेचे एटीएम गॅस कटरच्या साहाय्याने कापून त्यातील १३ लाख ३० हजारांची रक्कम चोरट्यांनी ८ मे २०१९ रोजी लंपास केली होती. या घटनेतील आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षक परदेशी यांच्या आदेशान्वये अप्पर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवा ठाकरे यांच्या नेतृत्वात पथक नेमले होते. या पथकाने तांत्रिक बाबीच्या तपासावरून हरियाणा राज्यातून आरोपी शाहरूख खान सुभान खान (रा. घड्या ता. जि. नुह)आणि अब्बास खान आयुब खान (रा. घड्या ता. जि. नुह) यांना सापळा रचून अटक केली. अधिक तपास केला असता, सदर गुन्हा केल्याचे त्यांनी मान्य केले.
तसेच जिल्ह्यातील शिवणी तालुका मंगरुळपीर येथील एटीएम दोन वेळा फोडले. तसेच केशवनगर, रिसोड तालुक्यातील रिठद आणि केनवड येथील एटीएम फोडून चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. सदर आरोपी हे ज्या एटीएममध्ये चोरी करायची असेल त्या भागाची पाहणी करून, जवळच्या शहरातून चारचाकी वाहन चोरी करायचे आणि यानंतर याच वाहनाचा वापर पुढील चोरीसाठी करायचे, असेही तपासातून समोर आले आहे. शाहरूख खान याच्याकडून पोलिसांनी २३ हजार ७०० रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेले साहित्य जप्त केले आहे.
तिजोरी पळवणारी टोळी पोलीस कोठडीत
जिल्ह्यातील किन्हीराजा येथील अकोला सहकारी बँकेतील तिजोरी पळविणारी टोळीदेखील जेरबंद करण्यात आली. या घटनेतील आरोपी सागरसिंग सुरजितसिंग बायरी (रा. जालना), कलदारसिंग मिकासिंग टाक (रा. जालना), मुकिंदरसिंग मिकासिंग टाक (रा. बिबि ता. लोणार जि. बुलडाणा) अशा तिघांना अटक करून त्याच्यांकडून १ लाख ६९ हजार ८०० रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. सदर आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.
३ अल्पवयीन बालकांनी चोरल्या ४ दुचाकी
मोटारसायकल चोरी करणाऱ्या ३ विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ४ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्या पालकांना बोलावून पालकासमक्ष विचारपूस केली असता, त्यांच्या ताब्यातील दुचाकी या जिंतुर जि. परभणी येथून चोरी करून आणल्याची कबुली त्यांनी दिली. अशी माहिती पोलीस अधीक्षक परदेशी यांनी दिली आहे.
घरफोडी करणाऱ्या टोळीच्या माध्यमातून ११ गुन्ह्यांचा खुलासा.
जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या टोळीस अटक केली असून, या टोळीमार्फत ११ गुन्हे उघडकीस आले आहेत. ग्राम चिखली झोलेबाबा येथील आरोपी अनिल लालुका भोसले (वय ३७), अविन प्रकारा पवार (वय २४) आणि अमोल तिरुपन पवार (वय २३) यांच्याकडे तपास केला असता, वाशिम जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी एकूण ११ ठिकाणी घरफोड्या केल्याचे या आरोपींनी मान्य केले आहे. या आरोपींकडून २५ मोबाईल आणि ३ लाख ९३ हजार ८१४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.