वाशिम - सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज ३१ ऑक्टोबरला आयोजित ‘रन फॉर युनिटी’मध्ये वाशिमकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. विद्यार्थी, युवक, खेळाडू, अधिकारी, कर्मचारी, पोलीस दलातील कर्मचारी, नागरिक या एकता दौडमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी परदेशी यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिनानिमित्त शपथ दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक परदेशी व अप्पर जिल्हाधिकारी वानखडे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून जिल्हा क्रीडा संकुल येथून दौडला सुरुवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, न. प. टेकडी, बाळू चौक, शिवाजी चौक, पाटणी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे पुन्हा जिल्हा क्रीडा संकुल येथे आल्यानंतर दौडचा समारोप झाला.
विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, पोलीस व होमगार्ड कर्मचारी, पोलीस पाटील, पोलीस मित्र, अधिकारी-कर्मचारी, विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी, प्रशिक्षक, खेळाडू व नागरिक या दौडमध्ये सहभागी झाले होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक पवन बन्सोड, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटीये, शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांच्यासह स्वयंसेवी संस्था, विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.