वाशिम - जिल्ह्यातील मेडशी येथे श्रावण महिन्यात बंजारा समाजातील सर्व महिला, पुरूष आणि बालक मोठ्या उत्साहाने तिज उत्सव साजरा करतात. दहा दिवस चालणार या तिज उत्सवातून वाशिममधील बंजारा समाज आपल्या परंपरेची जपवणूक करताना दिसत आहे.
मेडशी येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील श्रावण महिन्यात बंजारा समाजातील महिला व पुरुषांनी मोठ्या उत्साहात तिज उत्सव साजरा केला. या वेळी गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत पारंपरिक बंजारा पोषाखात महिला व लहान मुलींनी सहभाग घेतला होता. महिलांनी डोक्यावर तिज घेऊन बंजारा भाषेतील गीत गात, नृत्य करत या तिजची गावातुन मिरवणूक काढण्यात आली.
तिज उत्सवाचे स्वरूप...
या उत्सवाच्या पहिल्या दिवशी महिला व मुली गावाबाहेर असलेल्या वारूळाची काळी माती आणुन एका टोपलीत ती माती टाकुन सेवालाल महाराज व जगंदबा देवीच्या मंदिरात ठेवतात. यानंतर दररोज सकाळी, संध्याकाळी त्याची आरती केली जाते. दहा दिवस हा कार्यक्रम दररोज चालु असतो. दहाव्या दिवशी सकाळी अकरा वाजल्यापासुन गावातून तिज उत्सावाची भव्य मिरवणूक काढली जाते. यामध्ये गावात ठिकठिकाणी या तिजचे स्वागत केले जाते. मेडशी येथील समाज सेवक प्रेमचंद जैन यांनीही या तीज उत्सवाचे स्वागत केले.