वाशिम- शेतकऱ्यांच्या सोयाबीनला अंकुर फुटल्याने सोयाबीन सुकवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. खरिपात सुरुवातीला बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे दुबार पेरणी करावी लागली होती. आता परतीच्या पावसाने झोडपले त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या हातचे पीक गेले आहे. तर काही शेतकऱ्यांनी काढणी केलेले सोयाबीन भिजले आहेत.
यंदा परतीच्या पावसाने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना रडकुंडीला आणले आहे. ऐन काढणीवर आलेल्या सोयाबीनला परतीच्या पावसाने दणका दिला. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील अनेक गावात शेतकऱ्यांनी पावसातच सोयाबीन काढले आहे. आता त्या पिकाला वाचवण्यासाठी आणि सुकवण्यासाठी शेतकऱ्य़ांना चांगलीच कसरत होत असल्याचे दिसत आहे.
मागील तीन वर्षांत वाशिम जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अवषर्णाचा मोठा फटका बसला आणि या तीन वर्षांच्या कालावधित सोयाबीनचे उत्पादन जवळपास ६० टक्के घटले. काही शेतकऱ्यांना तर सोयाबीन काढणेही परवडले नाही. यंदा पावसाने सुरूवातीचे दोन महिने चांगली साथ दिल्याने मागील तीनही वर्षांची कसर पूर्ण होईल असा विश्वास वाटत होता. परंतु परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी काढणी केलेले सोयाबीन भिजल्यामुळे सोयाबीनला अंकुर फुटले. त्यामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.