वाशिम - जिल्ह्यातील कोरोनाच्या दोन्ही लाटेत कोरोना मुक्त राहलेले गाव आहे मोरगव्हाण वाडी. या गावात अद्याप एकही बाधित आढळला नसून या गावाच्या उपययोजना जर इतरांनी अवलंबिल्या तर त्यांचं गाव ही कोरोना मुक्त राहील.
जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पसरत गेला. जिल्ह्यात एकूण 789 गावे असून यातील 788 गावात कोरोनाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या लाटेत कुणाला ना कुणाला तरी संसर्ग झालाच आहे. मात्र, जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील मोरगव्हाण वाडी या 404 लोक वस्तीच्या गावाने दोन्ही लाटेत कोरोनाला गावात पाय ठेवण्यापासून रोखण्यात यश मिळविले आहे. मोरगव्हाण वाडी मध्ये कोरोना संसर्ग पसरू नये, म्हणून ग्राम पंचायतच्या वतीने सर्वत्र फवारणी, ग्रामस्थांची आरोग्य तपासणी, बाहेरून आलेल्यांचं गावाबाहेर विलगिकरण या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे एकाही ग्रामस्थाला कोरोनाचा संसर्ग झाला नसून गाव अद्यापही कोरोना संसर्गापासून मुक्त आहे.
मोरगव्हाण वाडीचे ग्रामस्थ कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, म्हणून कोरोनाची त्रिसूत्री पाळत आहेत. आरोग्य विभागाकडून कोरोना संसर्ग कमी व्हावा, यासाठी ग्रामस्थांच्या आरोग्य तपासणी सह इतर उपाय योजना करण्यात येत आहेत. त्यामुळे कोरोनाला अटकाव झाल्याचे आरोग्य सेवक गजानन पद्मने यांनी सांगितलंय. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून आम्ही गावकऱ्यांना कोरोनाची त्रिसूत्री सांगितली. इतर ही नियमांचं काटेकोर पालन होत असल्यानेच मोरगव्हाण वाडी कोरोनाच्या संसर्गापासून दूर आहे.
मोरगव्हाण वाडी या गावामध्ये कोरोना संसर्ग पसरू नये म्हणून आम्ही लहानांपासून वयोवृद्धापर्यंत कोरोनाच्या त्रिसूत्रीचं पालन करत आहोत. प्रतिकार शक्ती मजबूत राहावी यासाठी आयुर्वेदिक काढा आणि सात्विक आहार घेत आहोत त्यामुळे आम्ही कोरोनाला गावच्या वेशीवर रोखण्यात यश आलं, असं गावकरी सांगतात.