वाशिम - शहर व जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक आणि एसटी बस सेवा सुरू करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बुधवारी वाशिममध्ये डफडे बजाव आंदोलन करण्यात आले. वाशिम बसस्थानकात करण्यात आलेल्या आंदोलनावेळी वंचितच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आल्याने सर्वसामान्य जनतेच जगणं कठीण झाले आहे. तसेच सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने सर्वसामान्य जनतेला प्रवासासाठी अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे राज्यातील एसटी महामंडळच्या बस सुरू कराव्यात, तसेच लॉकडाऊन संदर्भातील विविध मागण्यांसाठी वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी डफडे वाजवून आंदोलन करत सरकारचे आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्ह्यात अद्यापही सार्वजनिक वाहतूक सुरू करण्यास परवानगी देण्यात आली नाही. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी सारख्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत. मात्र याचा सर्व सामान्य जनतेच्या आर्थिक उपन्नावर परिणाम होत आहे. याच पार्श्वभूमीवर वंचितच्या वतीने आंदोलन करण्यात आले.