वाशिम - मुस्लीमधर्मियांचे पवित्र स्थळ हज येथे भारतातून दरवर्षी हजारो भाविक जातात. यासाठी अनेक ट्रॅव्हल्स कंपनी भाविकांना सेवा पुरवत असतात. परंतु, वाशिम येथे गोल्डन इंटरनॅशनल टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स कंपनीकडून ऑनलाईन पेमेंटद्वारे १५ हज यात्रेकरुंची ७ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे.
गोल्डन इंटरनॅशनल टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्सच्या अमजद मलिक, शाहीद मलिक आणि जाहीद मलिक या तिघांनी उमरा आणि इराक येथे हज यात्रेसाठी पाठवतो असे सांगून जिल्ह्यातील १५ हज यात्रेकरुंकडून प्रत्येकी ६५ हजार रुपये याप्रमाणे ७ लाख ६५ हजार रुपये ऑनलाईन पेमेंटद्वारे घेतले. मात्र, यापैकी एकालाही हज यात्रेसाठी घेवून जाण्यात आले नाही. याप्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मो. खालीक (राहणार, वाशिम) यांनी वाशिम शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली.
पोलिसांनी याप्रकरणातील आरोपी जाहीद मलिक याला नांदेड येथे अटक केली आहे. अधिक तपासासाठी त्याला वाशिम येथे आणण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस जाहीदची चौकशी करत असून अन्य २ आरोपींचा शोध घेतला जात आहे.