वाशिम- होळी, रंगपंचमीसाठी वापरण्यात येणारे रासायनिक रंग चेहरा आणि त्वचेसाठी घातक असतात. त्यासोबतच जगभरात कोरोना व्हायरसने भिती पसरविली आहे. कोरोनाचा विषाणू संसर्गातून पसरतो. त्यामुळे कोरोना टाळण्यासाठी रंगपंचमीत रंग न खेळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील मालेगावमध्ये 'हॅपी फेसेस द कॉंसेप्ट स्कुल' येथे विद्यार्थ्यांना नैसर्गिक रंगनिर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
हेही वाचा- १५०० आदर्श शाळांसाठी पाच हजार कोटींचा प्रकल्प; तरतूद मात्र शून्य
वसंत ऋतूत बहरणारा पळस आणि निसर्गातील इतर उपलब्ध फुलांपासून विद्यार्थ्यांनी रंग बनवून धुलिवंदनासाठी नैसर्गिक रंग वापरण्याचा संकल्प केला. पळस, गडद भगव्या रंगाचे फुले वाळवून त्यापासून नैसर्गिक भगवा आणि लाल रंग तयार करण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे.
दरम्यान, झपाट्याने फोफावत चाललेल्या प्राणघातक कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी चिनमधून आलेला रासायनिक रंग खेळणे टाळून नैसर्गिक रंग खेळण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला आहे. 'खेलो होली ईको फ्रेंडली' या शीर्षकांतर्गत आयोजित नैसर्गिक रंग निर्मिती कार्यशाळेचे व विद्यार्थ्यांनी केलेल्या दृढ संकल्पाचे हॅपी फेसेस द कॉन्सेप्ट स्कुलचे संचालक दिलीप हेडा व कविता हेडा यांनी कौतूक करुन शुभेच्छा दिल्या आहेत.