वाशिम - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वाशिम जिल्हा 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन आहे. त्यामुळे आज (सोमवार) सकाळपासून नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला खरेदी तसेच पेट्रोल पंपावर गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा... लोकांना जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्यासाठी प्रयत्न - जिल्हाधिकारी
रविवारी जनता कर्फ्युमध्ये संपूर्ण वाशिम जिल्हा कडकडीत बंद होता. या बंदमध्ये जीवनावश्यक वस्तू, भाजी मार्केट ही दुकाने देखील स्वयंस्फूर्तीने बंद होते. मात्र, आज सकाळपासून शहरातील महात्मा फुले भाजी मार्केट खुले असून शहरातील नागरिक भाजीपाला व जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी गर्दी करताना दिसत आहेत.
शहरातील केवळ दूध, भाजी मार्केट, पेट्रोल पंप सुरु असून मोजक्या संख्येत नागरिक घराबाहेर पडत आहेत. खबरदारी म्हणून घरातच राहण्याचे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.