वाशिम - पेट्रोलचे दर गगनाला भिडलेले, तर दुसरीकडे उतार वयात दुचाकीचा भार तोलने शक्य होत नाही. त्यामुळे 75 वर्षीय आजोबांनी टाकाऊ वस्तूपासून ई-सायकलची निर्मिती केली. सिद्धेश्वर पाठक असे ई सायकल तयार करणाऱ्या रँचो आजोबाचे नाव आहे. या सायकलमुळे खर्चाची बचत होण्यासोबतच सुरक्षित प्रवास शक्य असल्याचे सिद्धेश्वर पाठक हे सांगतात. त्यांच्या या अनोख्या प्रयोगाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
वाशिमच्या सिव्हिल लाईन भागात राहणारे सिद्धेश्वर पाठक हे ७५ वर्षीय व्यक्ती विमानतळ प्राधिकरणामध्ये नोकरीला होते. ३६ वर्ष त्यांनी इंदौर आणि वाशिमच्या विमानतळमध्ये नोकरी केली. उतरत्या वयात दुचाकी वापरणे कठीण होत चालले होते. त्यात गाडीचा तोल सांभाळणे कठीण होते. तर दुसरीकडे इंधनाचे दर वाढत चाललेले आहेत. यावर पर्याय म्हणून सिद्धेश्वर पाठक यांनी ई सायकलची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला.
पंच्चाहत्तर वर्षीय आजोबांनी 'अशी' बनवली ई-सायकल
वायू दलातून सेवानिवृत्त झालेल्या पाठक यांना दुचाकींचा भार तोलत नव्हता. शिवाय पेट्रोलचे दर देखील कमालीचे वाढले. त्यामुळे त्यांनी बॅटरीवर चालू शकेल, अशी ई-सायकल बनविण्याचा निर्णय घेतला. यासाठी मुलाच्या कॉम्प्यूटर दुरुस्तीच्या दुकानातील व घरातील टाकाऊ वस्तूचा उपयोग केला. तसेच बाजारातून नवीन सायकल व मोटर आणून महिनाभराच्या अथक प्रयत्नातून ई. सायकल बनविली. या सायकलसाठी केवळ 1 युनिट वीज वापरून 20 ते 25 किमीचा सुरक्षित प्रवास शक्य असून लहान मुलांना देखील ही सायकल चालविणे जोखमीचे नसल्याचे पाठक यांनी सांगितले.
ई-सायकल बनवायला 'इतका' आला खर्च
या सायकलला बनवण्यात सात हजार रुपयांचा खर्च आला असून सायकलचा खर्च वेगळा आहे. नवीन ई-सायकल तयार करण्यासाठी १८ हजार रुपये खर्च येऊ शकतो असे सिद्धेश्वर पाठक यांनी सांगितले. एक वेळा ५ तास चार्जिंग केल्यानंतर २० किमी अंतरावर सायकल धावते तर त्यासाठी फक्त 5 रुपये खर्च येतो. एक युनिट पेक्षा कमी विजेचा वापर होते.
वृद्ध आणि लहान मुलांसाठी ही ई-सायकल अतिशय फायद्याची असून पर्यायी इंधनाची बचत होऊन प्रदूषणही कमी होते. इतकेच नाहीतर, या सायकलसाठी परवान्याची आवश्यकता नाही. लवकर या सायकलवर प्रयोग करून आणखी जास्त किलोमीटर कशी चालू शकेल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पाठक यांनी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीला बोलताना सांगितले आहे.