वाशिम - जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड बिनविरोध झाली. त्यानंतर बुधवारी विषय समित्यांच्या सभापतींची निवडही बिनविरोध झाली आहे. महाविकास आघाडीसह वंचित बहुजन आघाडीही आता जिल्हा परिषदेच्या सत्तेत सहभागी झाली आहे.
विषय समित्यांच्या सभापतीपदी शिवसेनेचे विजय खानझोडे, काँग्रेसचे चक्रधर गोटे, महिला बालकल्याण सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शोभा गावंडे, तर समाजकल्याण सभापतीपदी वंचित बहुजन आघाडीच्या वनिता देवरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
विषय समित्यांच्या सभापतीपदांसाठी अपक्ष अरविंद इंगोले, शिवसेनेकडून विजय खानझोडे, काँग्रेसकडून चक्रधर गोटे, भाजपकडून श्याम बढे, काँग्रेसकडून दिलीप मोहनावाले यांनी अर्ज दाखल केले होते. तर महिला व बालकल्याण सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शोभा गावंडे, भाजपकडून विनादेवी जयस्वाल, समाजकल्याण समितीसाठी काँग्रेसकडून दिलीप मोहनावाले, भाजपकडून श्याम बढे, वंचित बहुजन आघाडीकडून वनिता देवरे व कल्पना राऊत यांनी नामनिर्देशपत्र सादर केले होते. यापैकी दिलीप मोहनावाले, श्याम बढे, अरविंद पाटील इंगोले, विनादेवी जयस्वाल व कल्पना राऊत आदींनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने चारही विषय समितीची निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश राऊत यांनी जाहीर केले .