वाशिम - जिल्ह्यातील अवरदरी गावातील भीषण पाणी टंचाईचे धगधगते वास्तव ईटीव्ही भारतने समोर आणले होते. त्यानंतर सत्यसाई समितीने सामाजिक जाणिवेतून या गावाला आधार देण्यासाठी आठवड्यातून २ दिवस पाण्याचे टँकर देण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून या गावात सत्यसाई समितीकडून टँकरद्वारे पाणी विहिरीत सोडले जाणार आहे. त्यामुळे गावकऱ्यांची तहान भागवली जाणार असून काही प्रमाणात पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लागला आहे.
यंदा जानेवारीपासूनच जिल्ह्यातील अवरदरी गावात पाणी टंचाई निर्माण झाली असून गावात असणाऱ्या दोन्ही विहिरींनी तळ गाठला. घोट-घोट पाणी काढून २ किमी अंतरावरून पाणी आणावे लागत असल्याने महिला त्रस्त झाल्या होत्या. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन टँकर सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत असल्याची बातमी ईटीव्ही भारतने दिली होती. मात्र, प्रशासन काही धावून आला नाही. परंतु, सामाजिक जाणिवेतून सत्यसाई समिती गावाला मदत करण्यासाठी पुढे सरसावली. या गावाला आठवड्यातून २ दिवस टँकरने पाणी पुरविणार असल्याचे सत्यसाई समितीचे अध्यक्ष राजेश देशमुख यांनी सांगितले आहे.
शासनाने मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केलेल्या यादीत मालेगाव तालुक्यातील अवरदरी गावाचा समावेश आहे. मात्र, दुष्काळी परिस्थिती असूनही दुष्काळी सुविधा लागू केली नसल्याने गावात भीषण पाणीटंचाई आहे.