वाशिम - जिल्ह्यासह राज्यभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, एकीकडे लॉकडाऊन तर दुसरीकडे इंधन दरवाढीचा भडका, त्यामुळे आरोग्य सुविधा देणारे रुग्णवाहिका चालक देखील आर्थिक संकटात सापडले आहेत, अशा परिस्थितीत जिल्ह्यातील रिलायन्स पेट्रोल पंप चालकांनी कोरोनाबाधित रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णावाहिकांसाठी डिझेल मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. रिलायन्स पेट्रोलपंप संचालक संजय कुलकर्णी याबाबतची माहिती दिली.
सध्या लॉकडाऊनमध्ये अनेक संस्थाकडून सामाजिक जबाबदारी पार पाडली जात आहे. त्याच प्रमाणे वाशिम जिल्ह्यातील कोरोना महामारीच्या काळात रिलायन्स बीपी मोबिलिटीने विविध उपक्रमाची सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या सेवेकरीता उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिकांसाठी दररोज ५० लीटर डिझेल पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची कार्यवाहीदेखील सुरू झाली आहे.
30 जून पर्यंत सुरू राहणार योजना-
रुग्णवाहिकांना डिझेल देण्याच्या या योजनेबाबत बोलताना कुलकर्णी म्हणाले, की शासनाच्या 108 क्रमांकावरून सुविधा देण्याऱ्या रुग्णवाहिका आणि खाजगी रुग्णवाहिकेसाठी ही सुविधा पुरविण्यात येणार आहे. या रुग्णवाहिका शासनाने अधिग्रहित केलेल्या असाव्यात आणि त्या पूर्णवेळ कोरोनाबाधित रुग्णसेवेसाठी कार्यरत असाव्यात, यासाठी रुग्णवाहिका चालक-मालक यांच्याकडे वैद्यकीय अधिकारी यांचे पत्र सोबत असणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच ही मोफत डिझेल पुरवठ्याची सुविधा 30 जूनपर्यत सुरू ठेवण्यात येणार असल्याचेही कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.