वाशीम - जिल्ह्यातील मंगरूळपीर येथे अत्यंत दुर्मिळ पांढरा मेलानिन कवड्या नाग शहरातील पाकधाने यांचे घरी आढळला. या सापाला पाहण्यासाठी गावातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
पांढरा कवड्या साप हा मूळ कवड्या या जातीतील अल्बिनो प्रकारात मोडतो. ह्या प्रकारचा साप अतिशय दुर्मिळ असतो. या सापाच्या शरीरामध्ये रंगद्रव्याचा पूर्णतः अभाव असतो त्यामुळे हा साप पांढराशुभ्र दिसतो. या सापाचे डोळे लाल किंवा गुलाबी असू शकतात.
ऐल्बिनिजम ही जन्मजात होणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे या सापाची त्वचा पांढरी शुभ्र असते ऐल्बिनिजम असणारे प्राणी दुर्मिळ असतात. कवड्या साप हा बिनविषारी असून तो निशाचर असतो. पाली सरडे तसेच छोटे बेडूक या सापाच्या आहाराचा भाग आहेत. हा साप बिनविषारी असला तरी बऱ्याच प्रमाणात चिडचिडा असतो. त्यामुळे स्वतःच्या बचावासाठी हा बरेचदा चावा घेतो.
यापूर्वी जानेवारी महिन्यामध्ये अशाच प्रकारचा एक साप मिरज मध्ये आढळला होता. मंगरूळपीरच्या लाईफ कन्झर्वेशन चमू ने सापाला पकडले व वन विभागाच्या ताब्यात देवून त्याला जंगलात सोडले.