वाशिम - गोपीनाथ मुंडे यांचे नाव लावून मत मागता, असे म्हणणाऱ्यांच्या घरातील मुले २५ व्या वर्षी राजकाणात येतात, अशी नाव न घेता राष्ट्रवादीवर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी टीका केली आहे. त्या अकोला लोकसभा मतदारसंघातील युतीतील भाजपचे उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचारसभेदरम्यान रिसोड येथे बोलत होत्या.
पंकजा म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोक कसे दुखावले जातात हे बीडच्या राजकारणावरून स्पष्ट होत आहे. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये नाराज असलेले जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी युतीमध्ये प्रवेश केल्यास त्याचा आपल्याला फायदा होणार, असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आघाडी सरकारने इतके दिवस लोकांना आडवा आणि जिरवा, असे काम केले आहे. मात्र, आम्ही जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जमिनीत पाणी मुरवले आहे. त्यातून सिंचनाचा अनुशेष भरून काढला, असेही मुंडे यावेळी म्हणाल्या.