वाशिम - 'डेल्टा प्लस व्हेरियंट'चा संभाव्य धोका टाळण्यासाठी आवश्यक उपाय योजना आरोग्य विभाग करीत आहे. परंतु जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लस घेणाऱ्यांचे प्रमाण केवळ २३ टक्केच आहे. त्यापैकी केवळ 9 टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला असल्याने डेल्टा प्लसला कसे रोखणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील १३ लाख ५० हजार नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने समोर ठेवले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आरोग्य विभागाने १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिम सुरू केली. जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहिमेला सुरुवात होऊन सहा महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ३ लाख ७ हजार २३९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यापैकी २ लाख ६४ हजार ३५४ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. म्हणजेच एकूण लक्ष्याच्या 30 टक्के नागरिकांनी लसींचा पहिला डोस घेतला आहे. तर केवळ ८० हजार ७२१ लोकांनी म्हणजेच केवळ 9 टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला आहे.
जिल्ह्यातील दुर्गम भागात लस घेण्यासाठी नागरिक अजूनही पुढे येत नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. या भागातील नागरिकांच्या मनातील भीती काढण्यासाठी आरोग्य यंत्रणेने विविध मोहीम हाती घेतल्या आहे. जनजागृती करण्याचे काम राबविले जात आहे. मात्र, त्याला पाहिजे तसे यश अजूनही मिळाले नसल्याचे दिसून येते. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरणाच्या प्रक्रियेला गती देण्याचे आव्हान आरोग्य विभाग, पोलीस विभाग व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.