वाशिम - देशात सध्या लोकसभा मतदानाचा दुसरा टप्पा पार पडत आहे. या निवडणुकीत वाशिममधील रिसोड मतदारसंघातील ढोरखेडा येथील वयाची शंभरी पार केलेल्या आजोबांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. पिराजी वाळले असे या आजोबांचे नाव आहे. त्यांचे सध्याचे वय १०१ आहे. यावेळी त्यांनी चक्क १७ व्यांदा मतदान केले आहे.
वयाची शंभरी पार केली असली, तरीही या आजोबांच्या हातात ना काठी होती, ना डोळ्याला चश्मा. या वयातही एखाद्या तरुणाला लाजवेल, अशी त्यांची प्रकृती आहे. यावेळी ग्रामपंचायतमध्ये त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदान करावे, असे आवाहन पिराजी वाळले यांनी यावेळी केले. १०१ वय असलेल्या या आजोबांनी देशातील सर्व १७ लोकसभेच्या निवडणुकीत मतदान केले आहे हे विशेष.