वाशिम - शिरसाळा गावात पाण्याच्या शोधात आलेल्या रोही (नीलगाईचा प्रकार) प्राण्यावर कुत्र्यांनी हल्ला केल्याने त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला. गावकऱ्यांना ही बाब कळताच त्यांनी मालेगाव वन विभागाला फोन करून घटनेची माहिती दिली. मात्र, ते वेळेवर न पोहोचल्याने या प्राण्याचा जीव गेला, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
गावात पाणी पिण्याच्या शोधात आलेल्या रोही या वन्य प्राण्यावर कुत्र्यांनी हल्ला केला. यात तो जखमी झाला. त्यानंतर नागरिकांनी त्याला वाचविण्याचे प्रयत्न केले. त्यांनी मालेगाव वन विभागाला या घटनेची माहिती दिली. मात्र, मालेगाव वनविभागाचा कोणताच अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी आला नाही. त्यामुळे नागरिकांनी वाशिम वन विभागाला या घटनेची माहिती कळवली. त्यानंतर वाशिम वनविभागचे पथक घटनास्थळी पोहचले. मात्र, या पथकाला उशिर लागल्याने गावकऱ्यांच्या ५ तासाच्या संघर्षाला अपयश आले आणि यात जखमी रोहीचा मृत्यू झाला.