वाशिम - रिसोड तालुक्यात सध्या एक बोकड फारच चर्चेत आला आहे. या बोकडाची किंमत ऐकाल तर झोप उडेल असा हा बोकड आहे. अंगात १२ बोकडांचं बळ असलेल्या त्या बोकडाचे नाव आहे सोन्या... याची किंमत ऐकून भल्या भल्यांची झोप उडाली आहे. हैदराबादच्या एका गिऱ्हाईकाने याला तब्बल ११ लाख ७५ हजार रुपयांना मागणी केल्यामुळे हा सोन्या बोकड पंचक्रोशीत चर्चेचा विषय झालाय. इतक्या रकमेत तर रेसचा घोडा विकत घेता येऊ शकतो. तर मग तुम्ही म्हणाल याला एवढी किंमत येण्याचे कारण काय ? तर हा सोन्या जन्माला आला तोच डोक्यावर अर्ध चंद्राची खूण घेऊन. अशी खूण असलेला बकरा मुस्लिम धर्मामध्ये बकरी ईदला कुर्बाणी द्यायला महत्त्वाचा समजला जातो. त्यामुळेच या बोकडाची किंमत लाखांच्या घरात आहे.
वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील खडकी ढंगारे येथील जिजेबा खडसे यांच्या शेळीने दीड वर्षांपूर्वी दोन पिल्लांना जन्म दिला. यातील एका पिल्लाची त्यांनी १० हजाराला विक्री केली. मात्र सोन्याच्या डोक्यावर अर्ध चंद्र असल्यामुळे त्याची वाढ करण्याचा विचार जिजेबाने केला. आता सोन्याची वाढ दणकट झालीय. त्याचा फोटो जिजेबाने फेसबुकवर टाकला आणि त्याला मागणी येऊ लागली.
घरातल्या मुलाप्रमाणे सोन्याची वाढ केल्याचे लक्ष्मीबाई सांगतात. सोन्याचा आहारही जबरदस्त आहे. ताजा भाजीपाला, केळी, शेंगदाणा पेंड असा त्याचा तगडा आहार आहे. तर असा हा लाखमोलाचा सोन्या जिजेबा खडसे यांचे भविष्य बदलवणार हे निश्चित.