वाशिम - जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील कुत्तरडोह येथील नवविवाहित महिलेने नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. त्यांच्या लग्नाला एक महिनाही पूर्ण झाला नसताना विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
मालेगाव तालुक्यातील जामखेड येथील तुकाराम पांडे यांनी त्यांची मुलगी रुख्मिना हिला फोन लावला. त्यावेळी त्यांचे जावई विलास पवार यांनी फोन उचलला. जावई पवारने फोनवरून सांगितले की, तुमच्या मुलीला घेऊन जा, मला फारकत हवी आहे. मला दुसरे लग्न करायचे आहे, अशी धमकीही त्याने दिली. त्यामुळे नवविवाहित रुख्मिनाने आत्महत्या केल्याची तक्रार तिचे वडील तुकाराम पांडे यांनी जऊळका पोलीस ठाण्यात दिली. जऊळका पोलिसांनी आरोपी विलास पवार याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.