वाशिम - मंगरुळपीर पोलिसांनी तऱ्हाळा येथील चेक पोस्टवर ४८ किलो चांदी जप्त केली आहे. निवडणूक काळात मंगरुळपीर पोलिसांची ही दुसरी कारवाई आहे. या घटनेनंतर चेक पोस्टवरील पोलीस व इतर विभागाचे कर्मचारी आता प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करीत आहेत.
मंगरुळपीर तालुक्यातील तऱ्हाळा फाट्यावर चेकपोस्ट आहे. त्या चेकपोस्टवर रात्री साडे आठ वाजताच्या दरम्यान पोलीस व एकात्मिक बालविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून वाहनांची तपासणी सुरू होती. त्यादरम्यान या टाटा झेस्ट (एम.एच २९ ए आर ५५६७) वाहनाची तपासणी करण्यात आली असता त्यामध्ये ४८ किलो चांदी आढळली. वाहन चालक चेतन गावंडे व मुद्देमाल मालक जिग्नेश जयंतीलाल हिंडोचा (रा.यवतमाळ) यांना विचारणा केली असता सदर चांदी ही यवतमाळ येथील व्यापाऱ्यांची असल्याचे समजले.
हेही वाचा- वाशिममध्ये शाळकरी विद्यार्थीनीला ट्रकने चिरडल्याने जागीच मृत्यू
त्यांच्या बिलाची तपासणी केली असता काही बिले मागील तारखेची तर काही बिलांमध्ये तफावत आढळून आल्याचे मंगरुळपीर पोलिसांनी सांगितले. त्यावरून मंगरूळपीर पोलिसांनी ४८ किलो चांदी (किंमत १२ लाख) व वाहन असा एकूण १७ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे.