वाशिम - रंगपंचमीचा सण शांततेत पार पडावा, यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहीम हाती घेत रिसोड येथे दोन ठिकाणी अवैध गावठी दारू अड्यांवर कारवाई केली. यात 1 लाख 5 हजाराची दारू नष्ट करण्यात आली असून चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले .
रिसोड शहरातील माणुसकी नगर व जिजाऊ नगर भागात सुरू असलेल्या अवैध गावठी हातभट्टी दारू अड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवा ठाकरे यांच्या पथकाने सकाळी 5 ते 8 या वेळेत धाड टाकली. माणुसकी नगर भागातील संजय शेषराव पवार यांच्या ताब्यातून गावठी हातभट्टी दारू 20 लीटर व मोहामाच सड़वा 400 लिटर असा एकूण 45 हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. तसेच दिलीप पवार यांच्या ताब्यातून गावठी हातभट्टी दारू 20 लीटर व 300 लीटर मोहामाच सडवा असा एकूण 35 हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. यासह जिजाऊ नगर परिसरातील शांताबाई बाबला पवार हिच्या ताब्यातून गावठी 200 लीटर हजार असा 25 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
याप्रकरणी नमूद चारही इसमांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल मोहनकर, अजयकुमार वाढवे, पोलीस उप निरीक्षक शब्बीर खान पठाण, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक नारायण जाधव, पो.ना. सुनील पवार, राजेश राठोड, पोलीस शिपाई निलेश इंगळे, किशोर खंडारे व चालक सहा.पो.उप.निरीक्षक रमेश थोरवे यांनी सहभाग नोंदविला.