वाशिम - अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज वाशिममध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जेलभरो आंदोलन करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ सप्टेंबर २०१८ ला अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ केली होती. यामध्ये अंगणवाडी सेविकांना १ हजार ५०० रुपये, मिनी अंगणवाडी सेविकांना १ हजार २५० रुपये, मदतनीसला ७५० रुपये प्रमाणे मानधन वाढ केली. परंतु यासंदर्भातील प्रस्ताव अद्याप शासनाच्या मान्यतेसाठी प्रलंबित आहे.
त्यामुळे सदरहू मानधन वाढीचे प्रकरण त्याचप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अर्ध्या मानधनाएवढी रक्कम दरमहा पेन्शन म्हणून देण्याचा शासकीय निर्णय विनाविलंब घेण्यात यावा, आदी मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी/बालवाडी युनियन (आयटक) व कृतीसमितीच्यावतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडोच्या संख्येने अंगणवाडी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती