वाशिम - महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे पोळा सणाच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील वाघोळा येथे एक बैल मृत्युमुखी पडला आहे. उद्या पोळ्याचा सण असल्याने शेतकरी रामधन आडे बैल धुण्यासाठी नदीवर जात होते. रस्त्यात महावितरणच्या एका खांबाला शॉक लागून बैलाचा जागीच मृत्यू झाला. यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे.
पोळ्याच्या पहिल्या दिवशी खांदे मळणी व दुसऱ्या दिवशी पोळा असे दोन दिवस उत्सव साजरे केले जातात. बैलांना धुवून त्यांच्या शिंगांना रंगवले जाते. त्यांना गोड-धोड खाऊ घातले जाते. अंगावरती विविध सुताची रंगीबेरंगी सजावट करून सजवले जाते. शेतात वर्षभर कष्ट करून अन्नधान्य पिकवणाऱ्या बैलाच्या प्रति कृतज्ञता म्हणून हा सण साजरा होतो. या सणाशी शेतकऱ्यांच्या भावना जुळलेल्या असतात. मात्र, महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे पोळ्याच्या पहिल्याच दिवशी वाघोळ्यातील शेतकऱ्याच्या बैलाचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त होत आहे.
महावितरण कंपनीच्या विजेच्या खांबाला शॉक लागणे ही बाब गंभीर आहे. यामुळे माणसांच्या जिवालाही धोका उत्पन्न होऊ शकतो. शासनाने या गंभीर बाबीकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. तसेच, महावितरण कंपनीच्या संबंधित बेजबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणीही होत आहे.