वाशिम- यावर्षी कधी नव्हे ते तूर उत्पादक शेतकऱ्यांना 'सुगी'चे दिवस आल्याचे चित्रं आहे. वाशिम जिल्ह्यातील सोयाबीन नंतर प्रमुख पीक असलेल्या तूर पिकाला आज उचांकी 9 हजार 500 रुपये प्रती क्विंटल दर मिळाला आहे. त्यामुळं जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
तूर पिकाला शासनाचा हमीभाव 6000 हजार असतांना बाजार समितीत मात्र 9 हजार 500 रुपये दर मिळाला आहे. मात्र शेतकऱ्यांच पीक हाती आल्यावर तुरीला हेच दर मिळतील का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. हेच दर कायम राहिल्यास येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना याचा आर्थिक फायदा होणार आहे.
तुरीचा हंगाम दोन महिन्यावर आला असतांना समितीत जवळपास हमीभावपेक्षा 3 हजार 500 हजार रुपये जास्त दर मिळाला आहे. त्यामुळं जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये तूर पिकाला हमीभावपेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना आपला शेतमाल शासकीय आधारभूत किंमत योजनेअंतर्गत नाफेड मार्फत विकावा लागत होता. मात्र यंदा तुरीच्या हंगामापूर्वी दर वाढला असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
यावर्षी कोरोनामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. यावर्षी कोरोनामुळे पडलेले बाजारभाव आणि अतिवृष्टीमुळे उभे पीके नष्ट झाले, त्यामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. दरम्यान, या कठीण परिस्थितीत राज्यातील शेतकऱ्यांना आशेचा किरण दिसतो आहे. कारण, दरवर्षी पडणारे तुरीचे भाव मात्र आता पहिल्यांदाच वधारले आहेत.