कारंजा (वाशिम) - तालुक्यातील धनज बु. महसूल मंडळात सोमवारी दुपारनंतर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. साधारण 3 ते 4 तासात तब्बल 185 मिलिमीटर इतका पाऊस झाला. यामुळे धनज, आंबोडा, भामदेवीसह जवळपास 12 गावांमधील किमान 600 ते 700 हेक्टर जमिनीवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा पाऊस मागील 50 वर्षातील सर्वाधिक आहे.
कारंजा तालुक्यातील धनज परिसरात पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ढगफुटी सदृश्य झाला आहे. यामुळे परिसरातील आंबोडा, हिंगणवाडी, राहाटी, सिरसोली, माळेगांव, रामटेक, धनज खुर्द, मेहा, धोत्रा देशमुख, नागलवाडी , भामदेवी या गावांना पावसाचा चांगलाच तडाखा बसला. या परिसरातील जवळपास 90 टक्के पेरणी आटोपली होती. मात्र, मंगळवारी झालेल्या पावसामुळे सोयाबीन, तूर, कापूस, मुंग, उळीद, तसेच संत्रा, लिंबू या सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संपूर्ण शेतात पाणीच पाणी साचले आहे.
हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष : स्वतःचं घरं केलंय क्वारंटाइन सेंटर, पिसादेवी गावातील तरुणाचा स्तुत्य उपक्रम
पेरलेली शेते अक्षरशः खरडून निघाली आहेत. भिवरी येथील शेतकऱ्यांच्या शेतातील संत्राची झाडे उलमडून पडली आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांनवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. यामुळे प्रशासनाने या जमिनीची पाहणी करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.