वाशिम - जिल्ह्यातील कारंजा, मालेगाव, मंगरुळपीर, मानोरा तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात दमदार पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी सखल भागात पाणी साचले. तर मानोरा तालुक्यातील इंझोरी परिसरातील जामदारा घोटी शेत शिवारात सायंकाळी सहाच्या दरम्यान वीज पडल्याने मेंढपाल पिन्टू शिंदे (वय 28) यांचा जागीच मूत्यू झाला.
मानोरा तालुक्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे पोहरादेवी जवळ असलेल्या नाल्याला पूर आला होता. नाल्यावर असलेल्या पुलावरून पाणी वाहत असताना दिलीप चव्हाण या युवकाचा पूल ओलांडतांना तोल गेला. त्यानंतर तो मोटारसायकलसह पुरात कोसळला. पुराच्या पाण्यात वाहून जात असताना नागरिकांनी मोठ्या शिताफीने त्याला बाहेर काढत त्याचा जीव वाचवला.
अकोला-मंगरुळपीर महामार्गाचे काम सुरू आहे. तेथे शेलुबाजार जवळ अडाण नदीलाही पूर आला. त्यामुळे पुलाला लावलेली शेंटरिंग वाहून गेली आहे. यामुळे कंत्राटदाराचे मोठे नुकसान झाले आहे. काम सुरू असल्याने कंत्राटदाराने पुलाशेजारी वाहतुकीकरिता थातुरमातुर केलेला रस्ता पहिल्याच पाण्यात वाहून गेला. त्यामुळे नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार परिसरातही आज अचानक पाऊस झाला. तेथील गोगरी, हिरंगी, लाठी, चिखली, कंझरा, पिंप्री अवगण या गावात मुसळधार पाऊस कोसळल्याने नदी-नाल्यांना पुर आला आहे.