वाशिम - रस्ते ईमारती व पुल विकासाचे पहीले पाऊल असे ब्रिद प्रसिद्ध आहे. जनतेच्या कराच्या पैश्यातुन किमान रस्त्याची तरी अवस्था चांगली असावी ही सर्व सामान्य माणसांची माफक अपेक्षा असते. मात्र, सर्व समजून ही प्रशासन जेव्हा झोपेचे सोंग करते आणि या मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करते तेव्हा निश्चितच सर्वसामान्य माणसाला त्रास होतो. प्रसंगी रस्त्यावर अपघात होउन कुणाचा जीव जातो तर कुणी जखमी होतो. खड्ड्यामुळे कुटुंब संपले असते म्हणून त्या खड्ड्यानाचा बुजवण्यासाठी मालेगावचा एक रोडमॅन पुढे सरसावला आहे. मेडशी ते मालेगाव दरम्यान असलेले महाकाय खड्डे बुजवण्यासाठी शिक्षक अनिल गायकवाड परीश्रम घेत आहेत. सुट्टीच्या दिवसी भल्या पहाटे ते आपल्या दुचाकीला घमेले, फावडे आणि टिकाव बाधून खड्डे बुजवण्याच्या मोहिमेवर जात असून महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी परीश्रम घेत आहेत.
काही दिवसांपुर्वी सांयंकाळच्या वेळी दुचाकीने अकोल्याहून मालेगावकडे येत असताना महामार्गावरील रिधोरा वळनावर असलेल्या अवाढव्य खड्ड्यात त्यांची दुचाकी गेल्यामुळे मागे बसलेली पत्नी आणि मुलगी उसळून रस्त्यावर पडले होते. त्यात त्यांना किरकोळ दुखापतही झाली होती. मात्र, प्रसंगावधान राखून त्यांनी कसा बसा आपला जीव वाचवला. या घटनेमुळे अस्वस्थ झालेल्या अनिल गायकवाड यांनी महामार्गावरील खड्डे बुजवण्याचा निर्धार केला असून ८ दिवसांपासून रविवार आणि सुट्टीच्या दिवशी ते रस्त्यावरील महाकाय खड्डे बुजवून ईतरांच्या वाटेला असा अपघाताचा प्रसंग येऊ नये म्हणून ते परीश्रम घेत आहे.
अपघात झाल्याची बातमी जेव्हां शेजारी व आप्तेष्टांना कळली तेव्हा दही, भात, अंडी व लिंबु उतरवून टाकण्याचा सल्लाही त्यांना देण्यात आला. मात्र, कोणत्याही अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता गायकवाड यांनी हातात फावडे घेऊन खड्डे बुजवण्याचाच संकल्प केला. प्रशासन रस्त्याचा विकास करेल तेव्हा करेल, परंतु या खड्ड्यांमुळे कुणाचा जीव जाऊनये म्हणून त्यांनी प्रशासनाला दोष न देता स्वतः हाती टिकाव उचलून आठ दिवसांपासून महामार्गावरील पुष्कळ खड्ड्यात माती आणि दगड भरून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. ईतरांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून शिक्षक अनिल गायकवाड राबवीत असलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.