वाशिम - जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार येथे शेतकऱ्यांनी मान्सून पूर्व तूर पीक घेण्याचा निर्णय घेतला. मात्र ,या पिकावर सध्या मोठे संकट आले आहे. कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार परिसरातील शेतशिवारात शेतकऱ्यांनी मान्सूनपुर्व तुरीची पेरणी केली. मात्र, आता सहा इंच वाढ झाल्यावर या पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे तुरीचे पिक सुकू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
हेही वाचा... जागतिक निर्वासित दिन : जाणून घ्या प्रत्येक मिनिटाला जगामध्ये किती लोक निर्वासित होतात...
कोरोना या विषाणूजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन लागू करण्यात आले. मात्र, या काळात देखील परिसरातील शेतकऱ्यांनी जीवाचे रान करून मे महिन्यात मान्सूनपुर्व तुरीची लागवड केली. तळपत्या उन्हातही या पिकाला ठिबक सिंचनाच्या माध्यमातून जगवण्यासाठी मोठी कसरत शेतकऱ्यांना करावी लागील. आता पीक जगले असून त्याची वाढ होत आहे. परंतु, अनपेक्षिरित्या या पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसत आहे.
अचानक तूर पीक सुकू लागल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे कृषी विभागाने याकडे लक्ष देऊन संबंधित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.