वाशिम - जिल्ह्यात जूनअखेर आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतजमीन आणि पिकांचे नुकसान झाले. जिल्ह्यातील तब्बल 2 हजार 175 शेतकऱ्यांची जमीन उभ्या पिकासह खरडून गेली. त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अध्यापही शेतकऱ्यांना मिळाली नाही. ती नुकसानभरपाई लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
जून जुलै महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी काळ्या मातीसह पिकेही वाहून गेली. शेतकऱ्यांनी पेरणी केलेले पीक वाया गेल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले, तर काही ठिकाणी जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडू शकतो. झालेल्या नुकसानीचे तालुकास्तरावर पंचनामे करून जिल्हा स्तरावर पाठविण्यात आले. त्यात खरडून गेलेल्या 847 हेक्टर जमीनीचे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने अहवाल तयार केला आहे. मात्र, शेतकरी अद्यापही नुकसान भरपाई मिळण्याची वाट पाहत आहे.
एक महिना उलटूनही शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना या नुकसानीपोटी आर्थिक मदत मंजूर झाली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर मदत मिळवून द्यावी, अशी मागणी पीडित शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.