वाशिम - कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही नियम व अटीनुसार काही शेती आणि शेतीसंबंधित उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी खरीप पिकाच्या तयारीसाठी लागले आहेत.
देशात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण असल्याने चिंता वाढली आहे. मात्र, राज्याची अर्थव्यवस्था ढासळू नये म्हणून राज्य सरकारने ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही प्रमाणात उद्योगांना सवलत दिली आहे. त्यामुळे बाजार समित्या सुरू झाल्या आणि शेतकऱ्यांनी धान्य विक्रीस सुरुवात केली आहे. त्यामधून मिळालेल्या पैशातून पुढील हंगामातील पीक घेण्याच्या तयारीला शेतकरी लागला आहे. काही मजुरांना घेऊन शेत नांगरणे, शेतातील कचरा काढणे, शेणखत टाकणे हे सर्व कामे केले जात आहेत. मात्र, ही कामे करताना देखील सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात आहे. शेतकरी सुरक्षितता आणि स्वच्छतेला प्राधान्य देत शेतीचे काम करताना दिसत आहे.