बुलडाणा : विधानसभा निवडणूक 2024 च्या निकालात महायुतीला भरघोस यश मिळालं आहे. मात्र बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आपल्याला केंद्रीय मंत्र्यांनी मदत केली नाही. या उलट काँग्रेस नेत्यांना उमेदवार देण्याच्या सूचना केल्या, असा आरोप केला. त्यांच्या आरोपानं शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. मात्र त्यांच्या आरोपाला आता केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. त्यांच्या या उत्तरानं मात्र चांगलीच चर्चा रंगली आहे.
शिवसेनेचे आमदार संजय गाडकवाड यांचे प्रतापराव जाधवांवर आरोप : आमदार संजय गायकवाड यांनी केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव यांच्यावर केलेल्या आरोपामुळे शिवसेनेत चांगलाच वाद रंगला. "केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार संजय कुटे यांनी आपल्याला कोणतीच मदत केली नाही. त्यामुळे आपला निसटता विजय झाला," असा आरोप आमदार संजय गायकवाड यांनी एका कार्यक्रमात केला. शिवसेनेची धडाडती तोफ अशी ख्याती असलेल्या संजय गायकवाड यांच्या आरोपानं मात्र शिवसेनेत मोठी खळबळ उडाली.
प्रतापराव जाधव यांनी फेटाळले आरोप : आमदार संजय गायकवाड यांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यावर आरोप केल्याबाबतची प्रतिक्रिया माहिती माध्यम प्रतिनिधींनी त्यांना विचारली. यावेळी बोलताना प्रतापराव जाधव म्हणाले, की "आमच्या बुलडाण्याच्या उमेदवारांना जिंकण्याचा आत्मविश्वास होता. त्यांना असलेल्या आत्मविश्वासामुळे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभाही रद्द केली. त्यामुळे सक्षम उमेदवार असल्यानं त्यांनी मुख्यमंत्र्यांची सभा रद्द केली. त्यांना मोठ्या मतांच्या फरकानं जिंकून येण्याचा आत्मविश्वास होता. मताचं थोडं फार इकडं तिकडं झालं, मात्र आरोपात काही तथ्य नाही." मिलिंद नार्वेकरांना सांगून जयश्री शेळके यांना उमेदवारी दिल्याच्या आरोपावरही प्रतापराव जाधव यांनी भाष्य केलं. "उद्या राहुल गांधींना फोन करून बुलडाण्याचा उमेदवार द्यायला लावला, असा आरोप कोणी करेल. मात्र अशा आरोपात काही तथ्य नसते," असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
हेही वाचा :