वाशिम - कोरोनाच्या संकटामुळे शेतकऱ्यांच पुरते कंबरडे मोडले आहे. त्यातच पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे खरीर हंगामात वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. वारंवार येत असलेल्या नैसर्गिक संकटातून बाहेर येण्याचा प्रयत्न करीत असलेल्या शेतकऱ्याला आता बँकेकडून कर्ज भरण्यासाठी तगादा लावला जात आहे. बँकेकडून मिळणाऱ्या नोटीसमुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्या बाबत ईटीव्ही भारतने घेतलेला हा विशेष आढावा
यावर्षी देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊमध्ये बाजारपेठा बंद राहिल्या अन् शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यानंतर खरीप हंगाम सुरू झाला, जवळच्या पैशात कर्जाची रक्कम मिसळून शेतकरी पेरते झाले. मात्र सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने दुबार पेरणी करावी लागली, त्यामुळे शेतकरी पुरता संकटात सापडला आहे. त्यातच आता बँकांकडून कर्ज भरणा करण्याकरिता नोटीस बजावल्या जाऊ लागल्या आहेत. वाशिम जिल्ह्यातील वसारी गावातील शेकडो शेतकऱ्यांना महाराष्ट्र बँकेकडून कर्ज फेडण्यासाठी नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यात शेतकऱ्यांना न्यायालयात उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, हातात पैसाच नसल्याने गावातील अनेक शेतकऱ्यांनी कोर्टात जाण्याचे टाळले आहे.
![कर्ज परतफेडीसाठी बँकेकडून हजारो शेतकऱ्यांना नोटीस](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-wsm-spl-rtu-shetkari-bank-notice-washim_04082021080954_0408f_1628044794_875.jpg)
मनात वेगळाच विचार येतो-
वसारी येथील शेतकरी सीताराम जाधव यांना याबाबत विचारणा केली असता, ते म्हणाले की माझ्या जवळ 5 एकर शेती आहे, आणि या शेतीवर महाराष्ट्र बँकेचे 2 लाख रुपये कर्ज घेतले आहे. मात्र दोन वेळा पेरणी करून काहीच फायदा झाला नसून तिसऱ्यांदा पेरणी केली. मात्र आजही शेतात पीक नसून जमिनी काळ्याच राहिल्या आहेत. तसेच यापूर्वीच कोरोनामुळे जीवन जगणे कठीण झाले होते, त्याता आता बँकेकडून नोटीस पाठविण्यात आली. मात्र कर्ज फेडण्यासाठी आमच्या जवळ काहीच नाही, मग एवढी मोठी रक्कम आणावी तरी कुठून असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे मनात वेगळेच विचार निर्माण होत आहेत, अशी वस्तुस्थिती जाधव यांनी व्यक्त केली आहे.
सिताराम जाधव सोबतच गावातील इतर शेकडो शेतकऱ्यांना व जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना विविध बँकेकडून कर्ज फेडण्यासाठी नोटीस पाठवल्या आहेत. मात्र सद्यस्थितीत शेतकरीवर्ग अडचणीत असल्याने बँकेकडून पाठविण्यात येणाऱ्या या नोटीस थांबवाव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख दामू अण्णा इंगोले यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की बॅंकांनी कर्ज वसुलीची ही मोहीम लवकरात लवकर थांबवावी, नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्टाईलने अधिकाऱ्यांना धडा शिकवणार आहोत. तसेच या नोटीसमुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी चुकीचे पाऊल उचलले, तर मुख्यमंत्री यांच्यावर 302 गुन्हे दाखल करू असा इशाराही त्यांनी यावेळी सरकारला दिला आहे.