वाशिम - कोरोनाची सर्वत्र दहशत पसरल्याने मायभूमीत आलेल्या या कष्टकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशावेळी खऱ्या अर्थाने जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी काळ्या मातीशी असलेले इमान राखून पुढे सरसावला आहे. रोजगाराच्या शोधात वाशिम जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून शहरात गेलेले अनेक कुटुंब कोरोनाच्या भीतीने खेड्यात दाखल झाले आहेत. अशावेळी या कुटुंबांना रोजच्या उदरनिर्वाहासह अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
आज अडचणीत सापडलेल्या या आपल्याच बांधवांसाठी अनेक शेतकरी पुढे सरसावले आहेत. मंगरुळपीर तालुक्यातील लाठी येथील अल्पभुधारक शेतकरी गणेश सुर्वे यांनी आपल्या एक एकर टोमॅटो या गरजवंतासाठी शेलुबाजार येथील राजमुद्रा राजे शिवाजी ग्रुपच्या स्वाधीन केली आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने हा फलाहार गरजू बांधवापर्यंत पोहोचविण्यात येत आहे.