वाशिम - खरीप हंगामाला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरिपातील पेरणीला सुरुवात केली आहे. मात्र, अजूनही उन्हाच्या झळा कमी झाल्या नसून जोपर्यंत पेरणीयोग्य पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणीला सुरुवात करू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
जिल्ह्यात काही भागात मान्सूनपूर्व दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरिपातील सोयाबीन पेरणीला सुरुवात केली आहे. मंगरुळपीर तालुक्यात शेलुबाजार, मोझरी, कासोळा, वाढा यासह वाशिम तालुक्यातील जांभरून महाली येथे पेरणीला सुरुवात झाली. तर, जिल्ह्यात इतर ठिकाणी शेतकऱ्यांना दमदार पावसाची अपेक्षा आहे. यंदा जिल्ह्यात सर्वात जास्त 2 लाख 96 हजार हेक्टरवर सोयाबीन पेरणीचे नियोजन असून, शेतकऱ्यांनी पेरणी योग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.