वाशिम - मानोरा तालुक्यातील दापुरा येथील गजानन सोळंके यांनी दोन एकर शेतात पपईची लागवड केली. मात्र, ऐन विक्रीच्या मोसमात कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे मालाची उचल होणे कठीण झाले आहे. बाजारपेठ मिळत नसल्याने निराश होऊन अखेर त्यांनी आपल्या दोन एकर पपईच्या बागेवर रोटाव्हेटर फिरवले.
लागवडीसाठी आलेला लाखो रुपये खर्च वसूल झाला नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाच्या कृषी विभागाने या पपई उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

संचारबंदीमुळे सर्व उद्योग धंदे ठप्प आहेत. कामगार वर्गावर मोठे संकट ओढवले आहे. त्याचप्रमाणे शेतकरी वर्गही मोठ्या अडचणीत सापडला आहे. लॉकडाऊनमुळे परिवहन व्यवस्था ठप्प आहे. व्यापारी मालाची उचल करत नाहीत. त्यामुळे पिकवलेला माल फेकून देण्याशिवाय शेतकऱ्याकडे दुसरा पर्याय उरला नाही.