वाशिम - कारंजा नगरपरिषदेच्या हद्दीत राहणाऱ्या आजी-माजी सैनिकांचा मालमत्ता कर माफ व्हावा, या मागणीसाठी शुक्रवारी (13 ऑगस्ट) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास माजी सैनिकांनी आमरण उपोषण सुरू केले. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहिल, अशी माहिती या उपोषणकर्त्यांनी दिली.
हेही वाचा - ऊसाच्या थकित बिलावरून शेतकऱ्यांचे साखर कारखान्याच्या चिमणीवर चढुन 'शोले स्टाईल' आंदोलन
सीमेवर उभे राहून भारतीय सैनिक देशाचे रक्षण करतात, याच सेवेची दखल घेत कारंजा शहरात वास्तव्यास असलेल्या माजी सैनिकांना मालमत्ता कर माफ करण्यासाठी 22 फेब्रुवारी 2013 रोजी नगरपरिषदने एकमताने ठराव मंजूर करुन अंमलबजावणी करण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाला पाठविला. मात्र, अजूनही मालमत्ता कर माफ झाला नसल्याने माजी सैनिकांनी शुक्रवारपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. हे उपोषण आज (शनिवारी) दुसऱ्या दिवशी सुद्धा उपोषण सुरू होते. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही, असा पवित्रा या उपोषणकर्त्यांनी घेतला आहे.