वाशिम- जिल्ह्यात येण्यासाठी तसेच वाशिम जिल्ह्यातून महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात जाण्यासाठी मजूर, कामगार, पर्यटक, भाविक, विद्यार्थी व इतर व्यक्तींनी ई-पास प्राप्त करून घेणे अनिवार्य आहे. https://covid19.mhpolice.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करून ई-पास घरबसल्या मिळण्याची सुविधा निर्माण करून देण्यात आली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
संकेतस्थळावर ई-पास मिळविण्यासाठी अर्ज करतांना सुरुवातीला ‘जिल्हा/पोलीस आयुक्तालय’ या पर्यायाच्या ठिकाणी तुम्ही सध्या ज्या जिल्ह्यात अथवा पोलीस आयुक्तालय क्षेत्रात अडकलेले आहात त्या जिल्हा अथवा शहराची निवड करावी. त्यानंतर अर्जामध्ये नमूद माहिती अचूकपणे भरावी. संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरताना फोटो, आधारकार्ड अथवा फोटो असलेले ओळखपत्र तसेच कोविड-१९ विषयक लक्षणे नसल्याचा वैद्यकीय तपासणी अहवाल स्कॅन करून अपलोड करणे अनिवार्य आहे. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर मिळणारा टोकन क्रमांक जतन करून ठेवण्यास सांगितले आहे.
वाशिमकर सध्या जेथे अडकलेले आहात तेथील जिल्हा प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर त्यांना याच संकेतस्थळावर ई-पास उपलब्ध होईल. अर्ज भरल्यानंतर मिळालेला टोकन क्रमांक टाकल्यानंतर हा ई-पास उपलब्ध होईल. प्रवासामध्ये या ई-पासची प्रिंट सोबत ठेवणे आवश्यक आहे. ई-पास शिवाय कुणालाही वाशिम जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही, तसेच जिल्ह्याबाहेर जाण्यास परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे नागरिकांनी शासनाने दिलेल्या संकेतस्थळावर माहिती भरुन ई-पास प्राप्त करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जिल्हा प्रशासनामार्फत यापूर्वी देण्यात आलेल्या लिंकवर माहिती भरली असली तरीही https://covid19.mhpolice.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. त्याशिवाय ई-पास उपलब्ध होणार नाही. अधिक माहितीसाठी 07252-234238 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा अथवा 8379929415 या व्हाट्सअॅप हेल्पलाईन क्रमांकावर आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.