वाशिम - एकीकडे शासन शेतकऱ्यांचा माल मुंबई, पुणे येथे पाच ते सहा तासात पोहोचविण्यासाठी मोठ-मोठे रस्त्याचे जाळे निर्माण करीत आहे. मात्र, शिरपूर येथील शेकडो शेतकऱ्यांची शेतजमीन असलेल्या केळी भेरा शेतशिवाराकडे जाणारा रस्ता प्रचंड खराब झाला आहे. शेतकऱ्यांचा शेतातील माल घरी आणण्यासाठी असणारे पाणंद रस्ते प्रचंड खराब झाल्याने दोन महिन्यापासून शेतकऱ्यांचा सोयाबीन शेतातच अडकून पडला आहे.
हेही वाचा- ...चक्क राष्ट्रपती भवनासमोरून चोरले पाण्याचे २१ पाईप
रस्त्याच्या झालेल्या प्रचंड दुरवस्थेमुळे बैलगाडी, ट्रॅक्टर, पिक काढणीसाठी असणारी मशीन शेतात नेता येत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. या रस्त्याकडे मात्र शासन पुरेपूर दुर्लक्ष करीत आहे. अगोदरच अस्मानी संकटाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांपुढे या रस्त्याने अधिकच समस्या वाढविली आहे. त्यामुळे या रस्त्याचे लवकर काम करावे, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.