वाशिम - जिल्ह्यात गेल्या ३ वर्षांपासून सततच्या अवर्षणामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने केवळ रिसोड तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इतर तालुक्यावर अन्याय होत आहे. ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई आहे. त्यामुळे सरसकट संपूर्ण जिल्ह्यातील सहाही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावेत, अशी मागणी आम्ही शासनाकडे करणार असल्याचे विधानसभेचे उपनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने प्रत्येक विभागात समिती तयार केली आहे. विदर्भ विभागासाठी या समितीमध्ये विधानसभेचे उपनेते विजय वडेट्टीवार , वीरेंद्र जगताप, अतुल लोंढे, आमदार अमित झनक यांनी आज वाशिम जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता व दुष्काळाचे चटके सहन करणाऱया नागरीकांच्या समस्या जाणून घेतल्या. पाण्यासाठी टँकर आणि जनावरांना चारा छावण्या सुरू करण्याची मागणी वड्डेटीवार यांनी केली आहे. दुष्काळी उपाय योजना करण्यासंदर्भात शासन दरबारी मागण्यांचा पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.