वाशिम - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लोकांची गर्दी टाळणे हा एकमेव प्रभावी उपाय आहे. त्यामुळे या विषाणूच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी ३१ मार्च २०२० पर्यंत संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि जिल्हादंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी यापूर्वी दिले होते. या आदेशात बदल करून आता १५ एप्रिल २०२० पर्यंत जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग अधिनियम १८९७ लागू करण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रसाराला तत्काळ प्रतिबंध घालण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील सर्व गर्दीची ठिकाणे, बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - COVID-19 : इटलीकडून भारताने काय धडे घ्यावेत..?
जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांची गर्दी होवू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून अत्यंत आवश्यकता असेल तरच नागरिकांनी कार्यालयात यावे. अन्यथा शासकीय कार्यालयात येणे टाळावे, तसेच सामूहिक निवेदने, अर्ज, तक्रारी, फिर्याद कार्यालयास प्रत्यक्ष येऊन सादर करून नये, असे आदेश देण्यात आले होते. हे आदेश आता १५ एप्रिल २०२० पर्यंत लागू राहणार आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती भारतीय दंड संहितेनुसार शिक्षेला पात्र असेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.