वाशिम - देशात सध्या कोरोना संसर्गाचा उद्रेक होत असून रुग्णालयात बेड मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील शेलु बु येथील सीमेवर कर्तव्य बजावत असलेल्या सैनिकांनी गावातील गोरगरिबांना गावात उपचार मिळावा, यासाठी पुढाकार घेतला आहे.
वाशिम तालुक्यातील शेलु बु या गावातील 14 सैनिक सीमेवर लढत आहेत. सध्या कोरोनाचे महाभयंकर संकट आले आहे. त्यामुळे गावासाठी काहीतरी करायचे असे या सैनिकांनी ठरविले आणि गावात आढळलेल्या 30 रुग्णांवर गावातच उपचार सुरू केले व या सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यापुढेही गावात नेहमीसाठी उपचार सुरू ठेवणार असून यासाठी लागणारा औषधसाठा भरून ठेवला असून आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी हे काम पाहत आहेत.
विशेष म्हणजे हे सर्व सैनिक सध्या सीमेवर आहेत. मात्र रोज गावातील परिस्थिती विचारून जेवढी आर्थिक मदत लागते ती पाठवीत आहेत. तर गावात असलेल्या प्राथमिक उपचार केंद्र आम्हाला कोविड पुरते आमच्या ताब्यात द्यावे अशी मागणी सरपंच तृष्णा गुट्टे यांनी केली आहे.
एकीकडे कोरोनाने जगभरात थैमान घातले असून ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत. त्यामुळं कोरोना संकट काळात आपल्या जन्मभूमीचे ऋण फेडण्याची हीच वेळ असून, आम्हाला ही संधी मिळाली याचे आम्ही भाग्य समजत असल्याचे सैनिक सांगतात.
देशभरात कोरोनाने हाहाकार माजवला असून, हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीत. त्यामुळे गावातील गोरगरिबांना गावातच मोफत उपचार मिळावेत यासाठी गावातील जवान सरसावले आहेत. त्यामुळे या जवानांप्रमाणे प्रत्येक गावातील जबाबदार नागरिकांनी समोर येऊन काम केल्यास कोरोनाला हरविण्यास वेळ लागणार नाही यात मात्र शंका नाही.