वाशिम- राज्य शासनाने जाहीर केलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या याद्या यापूर्वीच प्रसिद्ध झाल्या आहेत. कर्जमुक्तीचा लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे कर्जमुक्तीसाठी पात्र शेतकऱ्यांच्या यादीत नाव असलेल्या ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण केलेले नाही, अशा सर्व शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषिकेश मोडक यांनी केले आहे.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी जिल्ह्यातील पात्र ९२ हजार ५१८ लाभार्थ्यांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर यापूर्वीच प्रसिद्ध झाल्या आहेत. यापैकी ८३ हजार ५०६ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. ९ हजार १२ शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण केलेले नाही. कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत खबरदारीचा उपाय म्हणून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया बंद ठेवण्यात आली होती. मात्र, आता आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरु झाली आहे.
कर्जमुक्तीच्या यादीमध्ये पात्र शेतकऱ्याच्या नावासमोर असलेला विशिष्ट क्रमांक, आधार कार्ड व कर्जखाते असलेल्या बँकेचे पासबुक इत्यादी कागदपत्रांसह शेतकऱ्यांनी नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्र, सेवा सहकारी संस्थांचे गट सचिव किंवा बँक शाखेत जावून आधार प्रमाणीकरणाची कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. पात्र शेतकऱ्यांची यादी आपले सरकार सेवा केंद्र, बँक व सेवा सहकारी संस्थेमध्ये उपलब्ध आहे.
आधार प्रमाणीकरण करताना सर्व आपले सरकार सेवा केंद्रचालक, सेवा सहकारी संस्थांचे सचिव, बँक अधिकारी-कर्मचारी, शेतकरी यांनी कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळणे, सामाजिक अंतर राखणे, सॅनिटायझरचा वापर, आदी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मोडक यांनी केले आहे.