वाशिम - आखाड्यात उतरलेले दोन्ही पैलवान तोलामोलाचे असल्याशिवाय कुस्तीत मजा येत नाही. त्याप्रमाणे यावेळची विधानसभेची ही निवडणूक एकतर्फी होत असल्याने पाहिजे तेवढी मजा येत नसल्याचे उपहासात्मक प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. वाशिम येथे भाजप उमेदवार लखन मलिक यांच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलत होते.
महाराष्ट्रात कुठेही जाऊन आपला काहीही प्रभाव पडणार नाही. हे समजून काँग्रेसचे युवराज बँकॉकला गेले असून सैन्य नसलेल्या सेनापती सारखी अवस्था राष्ट्रवादीची झाली आहे. त्यामुळे राज्यात परत लोकांच्या मनातील युतीचे सरकार येणार हे स्पष्ट झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र यांनी यावेळी सांगितले.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या निवडणूक जाहिरनाम्यात फक्त प्रत्येकाला ताजमहाल व प्रत्येक कुटुंबास चंद्रावर प्लॉट देण्याचेच आश्वासन देणे बाकी आहे. तसेच आपण सत्तेवर येणारच नाही त्यामुळे काहीच द्यायचेही नाही हे गृहीत धरून हा जाहीरनामा तयार करण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक होणार यात मुळीच शंका नाही - प्रकाश आंबेडकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाशिम जिल्ह्याला आकांक्षी जिल्हा घोषित केला असन या माध्यमातून जिल्ह्याला एक हजार कोटींचा विकासनिधी उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राज्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला समृद्धी महामार्ग 100 किलोमीटर वाशिम जिह्यातून जात आहे. यामुळे हजारो बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होऊन या प्रकल्पाने जिल्ह्याचा चेहेरामोहरा बदलणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - भाजप सत्तेत येण्यास राष्ट्रवादीचा चोंबडेपणा कारणीभूत; 'सामना'तून शरद पवारांवर खरमरीत टीका
वाशिम मतदारसंघात शिवसेनेकडून करण्यात आलेल्या बंडखोरीचा फडणवीस यांनी यावेळी समाचार घेतला. लोकसभा निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांची जाण न ठेवणाऱ्यांना वेळ आल्यावर दाखवून देऊ, असा सज्जड दम फडणवीस यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज देश प्रगतीच्या वाटेवर चालला असून राज्याला प्रगतीपथावर नेण्याकरता परत एकदा संधी देण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.