वाशिम - जिल्ह्यात असलेला एकमेव कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण निगेटिव्ह आल्यानंतर जिल्हा तूर्तास कोरोनामुक्त झाला आहे. कालच केंद्र शासनाने जाहीर केलेल्या यादीत ग्रीन झोन यादीत स्थान मिळाल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. मात्र, रेड झोन जिल्ह्यातील व्यक्ती छुप्या मार्गाने वाशिमध्ये प्रवेश करत असल्याचा घटना उघडकीस येत आहेत.
जिल्ह्याच्या चारही बाजूंनी असणारे बुलढाणा, अकोला, हिंगोली , अमरावती व यवतमाळ हे जिल्हे रेड झोन मध्ये गेले आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी कोरोनाचा जिल्ह्यात शिरकाव होऊ शकतो. प्रशासनने जिल्ह्यात जाणारे सर्व रस्ते सील करण्याचे आदेश आहेत. मात्र, शेजारील जिल्ह्यातील काही लोक जिल्ह्यात छुप्या मार्गाने प्रवेश करत असल्याचा घटना उघडकीस येत आहेत.
रिसोड तालुक्यातील येवती या हिंगोली आणि वाशिम जिल्ह्याच्या सीमेवरील गावात दररोज हिंगोली जिल्ह्यातील गावांमधून शेकडो लोक वाशिम जिल्ह्यात मोटरसायकल ने ये-जा करत असल्याची माहिती मिळाली. सदर, माहितीवरून आज सकाळी 09.30 वाजेदरम्यान पैनगंगा नदीतील महादेव मंदिराजवळून नदी ओलांडून अनेक लोक मोटरसायकलने वाशिम जिल्ह्यात ये-जा करत असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले.