वाशिम - शहरात अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची वाहने जप्त करणे, गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. आतापर्यंत 263 गुन्हे दाखल केले आहेत तसेच 50 वाहने जप्त केली आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संसर्ग टाळण्यासाठी संचारबंदी असताना नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी एक रुग्ण 'पॉझिटिव्ह' आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांकडून खबरदारी म्हणून विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाईची अंमलबजावणी सुरू केली आहे. पोलिसांकडून वारंवार नागरिकांना घरीच थांबा, संचारबंदी आदेशाचे पालन करा, असे आवाहन केले जात आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी सांगितले.