वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर संचारबंदी व राज्य तसेच जिल्हाबंदी असतानाही पुणे येथून सुदी येथे एका खासगी वाहनाने आठ मजूर दाखल झाले. याप्रकरणी संचारबंदी व 'लॉकडाऊन'चे उल्लंघन झाल्याने मालेगाव पोलिसांनी आठ मजुरांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच चारचाकी वाहनही जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांनी दिली.
यासोबतच जऊळका पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अमानवाडी येथे मध्य प्रदेश वरून आलेली रुग्णवाहिका जऊळका पोलिसांनी पकडली आहे. यामधील दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे मुलीला वाशिम जिल्ह्यातील गिव्हाकुटे येथून घेऊन जाण्यासाठी आले होते. नमूद इसमाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये लागू केलेल्या कलम १४४ जा.फौ.च्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यावरुन पोलिसांनी कारवाई केली आहे.