वाशिम - राज्य शासनाने मानव विकास मिशनच्या माध्यमातून शाळेत ये-जा करण्यासाठी राज्यभर मुलींसाठी एसटी महामंडळाने बसची व्यवस्था सुरू केली. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून वाशिम जिल्ह्यातील अमनवाडी येथील सावित्रीच्या लेकींना तीन किलोमीटर पायपीट करुन शाळेत जावे लागत आहे.
वाशिम जिल्ह्यातील अमनवाडी या गावात बारावीपर्यत शिक्षणाची सोय नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना बाहेरील गावात शिक्षणासाठी जावे लागते. इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणारे एकुण 70 हुन अधिक विद्यार्थिनी शिक्षणासाठी बाहेर गावी जात असतात. अमनवाडी गावात एस.टी बस येत नसल्याने मुलींना पायदळ जावे लागत आहे. जवळपास तीन किमी इतक अंतर पायपीट करुन या विद्यार्थ्यीनी शाळेत जात आहे. शाळेत जात असतानाचा रस्ता जंगलातून जातो. त्यामुळे वन्यप्राण्यांचा देखील धोका मुलींना आहे. मुलींना ये-जा करण्यासाठी राज्य शासनाने मानव विकास मिशनच्या माध्यमातून गावोगावी बसेची सोय केली होती. मात्र अमनवाडीतील विद्यार्थींनी गेल्या कित्येक दिवसांपासून ही बस गावात पाहिलेली नाही. यासंदर्भात मानव विकास मिशन व एसटी आगाराकडे वारंवार मागणी करण्यात आली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. परिणामी गावातील विद्यार्थ्यांचे हेडसांड होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन एसटी सुरू करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.