वाशिम - पावसाळा आला की रस्त्यांवरील खड्ड्यांचा सर्वात जास्त त्रास सुरू होतो. खड्ड्यांमध्ये पाणी साचून अपघाताचे प्रमाणही वाढते. शिवाय जास्त दिवस पाणी साचून राहिल्यास रस्ता खचण्याची भितीही असते. सर्वसामान्यांना खड्ड्यांचा त्रास कायम सहन करावा लागतो. मात्र, नुकतंच वाशिम जिल्ह्यात सर्वांची लाडकी लालपरी म्हणजे एसटी बस खड्ड्यात फसली. ती खड्ड्यातून काढण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना चांगलीच मेहतनत करावी लागली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून लातूर आगाराची माल वाहतूक करणारी बस जात होती. मात्र, रस्त्यावरील एका मोठ्या खड्ड्यात ही एसटी महामंडळाची माल वाहतूक करणारी बस फसली. ही गाडी खड्ड्यातून काढताना कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. कर्मचाऱ्यांना गाडी काढण्यासाठी चक्क हतोड्याचा वापर करावा लागला. हतोड्याने रस्ता फोडून नंतर बसचे चाक खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले.
वाशिम शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर लहान-मोठे खड्डे पडले आहेत. सद्या पावसाळा असल्याने पावसाचे पाणी या खड्ड्यांमध्ये भरते व खड्डे दिसत नसल्याने दररोज किरकोळ अपघात होत आहेत. त्यामुळे रस्त्यांची दुरुस्ती करणं गरजेचं आहे.